

सामाजिक कार्य
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, विट भट्टी - नगर :-
ट्रस्टने सन १९८५ मध्ये पुण्यातील सिंहगड रो पानमळा येथे या विटभट्टी कामगारांसाठी विनामूल्य घरकुले बांधुन दिली, कारण हे विट भट्टी कामगार अवघडलेल्या स्थितीत संसार चालवितात. ना घर! ना दार! जमिनीचे अंथरूण, आकाशाचे पांघरूण करून राहतात. दिवसभर चिखल तुडवायचा, विटा करायच्या आणि भट्टी लावायची, पोटाची टिचभर खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस मरेपर्यंत हेच कष्ट उपसायचे. कोण त्यांना आधार देणार? कोण त्यांना निवारा देणार? घरे देणार? भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी देशाला ''गरिबी हटाव''चा नारा दिला. विट भट्टी कामगार श्रमजीवी माणूस सुखावला आशाळभूत नजरेने तो समाजाकडे बघत राहिला. हे शिवधनुष्य उचलण्याचे आपण ठरविले. तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. शिवाजीराव निलंगेकर यांच्या शुभहस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विट भट्टी नगराचे उदघाटन केले. १०० घरांची वसाहत आपण बांधून कामगारांना हस्तांतरित केली. आज या कामगारांचे त्यांच्या मुलाबाळांचे संसाराचे परिवर्तन झाले आहे. त्याची मुले शिक्षण घेत आहेत. काहींचा व्यवसाय आहे. काही नोकरीला आहेत. गजाननाचा आर्शिवाद आम्हास फलद्रुप झाला असेही मंडळी असेही मंडळी अभिमानाने सांगतात.
शैक्षणिक उपक्रम :-
शिक्षणाच्या माध्यमातून आपण पुण्यनगरीत नजीकच्या काळात शैक्षणिक प्रकल्प उभा करीत आहोत. इयत्ता ५ वी पासून १२ वी पर्यंत कनिष्ठ महाविद्यालयाव्दारे आपण मराठी माध्यमाचे शिक्षण देण्यासाठी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय सुरू करीत आहोत. उत्तम, अनुभवी, गुणी शिक्षक यांच्याव्दारे विद्यार्थी वर्गाचे भवितव्य उजळणार आहोत. पालकांना देणगी देण्यापासून मुक्त करणार आहोत. वाजवी रास्त फी मध्ये राष्ट्रपातळीवरील शिक्षण देणार आहोत. शिक्षण क्षेत्राच्या कक्षा पदवीपर्यंत वाढविणार आहोत. बँचलर इन कॉप्युटर सायन्स, मास्टर इन कॉप्युटर सायन्स यासारखे बुध्दीचे तेज वाढविणारे अभ्यासक्रम सुरू करणार आहोत. गणपतीबाप्पाच्या आर्शिवादातून इंजिनिअरींग, वैद्यकीय या क्षेत्रात उंच भरारी घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्यासाठी शिक्षण क्षेत्रातील शिक्षण महर्षि, लोकप्रतिनिधी, लोकसेवक आणि जनता जनार्दनाचे सहकार्य आम्हाला मिळेल असा आम्हाला विश्वास आहे.
आय.टी.आय. :-
गरीब, गरजू, हुषार आणि बेकार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पुण्याच्या कोंढवा परिसरात औद्योगिक प्रशिक्षण केन्द्र उभारले आहे. या केन्द्रात टर्नर, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशयन, संगणक, फॅशन डीझायनींग यासारखे लोक उपयुक्त अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. प्रतिवर्षी दोनशे विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा लाभ होतो. गेल्या चार वर्षात येथे शिकलेला एकही विद्यार्थी बेकार राहिलेला नाही. नोक-या आणि सवंग धंदे देऊन या विद्यार्थ्यांना आम्ही रजाचे गज केले आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीमध्ये मोलाची भर घालण्याचे काम या प्रकल्पातून घडविले आहे.
कागद, कचरा, कांच कामगार :-
तळागाळातील गरीब, दुर्बल घटकांच्या कुटुंबामधील मुलांच्या शिक्षणाकरीता आपण पिताश्री वृध्दाश्रमात त्यांची नव्याने सोय करीत आहोत. दोनवेळचे विनामुल्य भोजन, विनामुल्य निवास व्यवस्था, विनामुल्य शिक्षण आणि भारतीय संस्कार देऊन राष्ट्रप्रेमी, सामर्थ्यवान, बुध्दीवादी आणि मानवतावादी तरूण तयार करीत आहोत. ज्यांना या संधीचा लाभ घ्यायचा आहे त्यांना पिताश्री वृध्दाश्रम, भाग्योदय नगर, कोंढवा येथील दरवाजे खुले आहेत.
पिताश्री वृध्दाश्रम :-

कोंढव्याच्या निसर्गरम्य परिसरात भाग्योदय नगरात तीन मजली अलिशान राजप्रसाद वृध्द माता - पित्यांच्या स्वागतासाठी तयार आहे. या इमारतीत सुमारे ७५ प्रशस्त खोल्या आहेत. मोकळी हवा, स्वच्छ व शुध्द गरम पाण्याची सोय, दोन वेळचे जेवण, अल्पोपहार, चहा बिस्कीटे, करमणूकीचे कार्यक्रम, सुसज्ज ग्रंथालय, ध्यान-धारणा, योगासनाचे वर्ग, टीव्ही, डॉक्टर्स यासारख्या अनेक सोई ठिकठिकाणी उपलब्ध केल्या आहेत. मायेचा आधार आहे. प्रेमाची बरसात आहे. सेवा सुश्रुषा आहे आणि मंगलमूर्ती गणरायाचे मन प्रसन्न करणारे मंदिर आहे.
सुवर्णयुग सह. बँक :-
लोकनेते मा. यशवंतरावजी चव्हाण यांनी सर्वमान्य व कष्टक-यांनी केंद्रबिंदु मानुन सहकार चळवळ महाराष्ट्रात रूजवण्याचे आव्हान केले. त्याला प्रतिसाद म्हणून २ ऑक्टोंबर सन १९७३ मध्ये आपल्या ट्रस्टने सुवर्णयुग सहकारी बँकेची स्थापना केली. बँकेच्या स्थापनेसाठी सर्वश्री तात्यासाहेब गोडसे, श्री शंकरराव सुर्यवंशी व कै. काशिनाथ रासने या त्रिमुर्तींनी जाणिवपुर्वक प्रयत्न केले. श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे च सामान्य माणसाला आर्थिक न्याय मिळाला पाहिजे ही प्रामाणिक भावना त्यामागे होती. आजतागायत या बँकेने ९ शाखांद्वारे कार्यविस्तार केला आहे. मुक्त अर्थव्यवस्था, जागतिकीकरण यामुळे बँकींग क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे व त्या आव्हानाला अनुसरून बँकेने संगणीकीकरण, कर्मचा-यांना प्रशिक्षण व ग्राहकाभिमुख सेवा दिलेली आहे. ही सुवर्णयुग बँक अनेक गणेश भक्तांना मोठा आधार ठरले आहे व लवकरच दोनशे कोटीकडे बँकेची वाटचाल होईल असा आम्हाला विश्वास आहे.
सुवर्णयुग स्पोटर्स क्लब :-
सन १९९२ च्या गुरूपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर निर्माण झालेल्या सुवर्णयुग स्पोर्टस क्लबची कबड्डीच्या क्षेत्रातील कामगिरी अतुलनीय अशीच आहे. महाराष्ट्र किंवा देशामध्ये कोठेही महिलांच्या स्पर्धा असल्या की तिथे सुवर्णयुग स्पोर्टस क्लबच्या खेळाडूंनी सर्व सामने मोठया गुणांनी जिंकल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचावयास मिळतात. आपल्या क्लबची प्रमुख खेळाडू कु. सुमती पुजारी ही स्वत:च्या खेळातील कौशल्यामुळे भारताच्या कबड्डी संघाची कर्णधार झाली व याचा आम्हाला अभिमान आहे. सुमतीच्या नेतृत्वाखाली महिला कबड्डीचा पहिला आशियाई चषक आपल्या देशाला मिळाला. सातत्याने विजयाची परंपरा आपल्या संघाने राखली आहे. सन १९९२ मध्ये ट्रस्टने साज-या केलेल्या शताब्दी महोत्सवामध्ये कबड्डी, खो-खो, मल्लखांब, व अखिल भारतीय हिंदकेसरी कुस्त्यांच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. पुरूषांसाठी तीन लाखाची बक्षिसे व महिलांसाठी दिड लाखाची बक्षिसे ठेवण्यात आली होती. अशा प्रकारे भारतीय खेळास ट्रस्ट सातत्याने प्रोत्साहन देते.
फिरते दवाखाने :-
सुमारे दोन दशकांपूर्वी ह्या आजाराचा खूप प्रभाव होता. मनुष्य विकलांग होत होता. विशेषत: ग्रामीण भागात याचा प्रसार खूप होता यासाठी ट्रस्टने पोलिओ निर्मुलन मोहिम हाती घेतली. जिल्हापरिषदेच्या सूचनेनुसार फिरता दवाखाना डॉक्टर्स व पोलिओ डोस घेऊन आमची पथके ग्रामीण भागात फिरू लागली व उपचार करू लागली. ही सेवा पुर्णपणे विनामूल्य होती व सुमारे वीस वर्षे ती अव्याहतपणे सुरू होती. ग्रामीण भागातील रूग्णांना त्याचा मोठा आधार होता. आता ह्या रोगाचा प्रभाव आटोक्यात आलेला आहे. सुवर्णयुग तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फेब्रुवारी १९८९ मध्ये उत्स्फुर्तपणे देणग्या गोळा करून एक रुग्णवाहिका सर्व सोयींनी सुसज्ज अशी उपलब्ध करून दिली. गोरगरिबांसाठी अत्यंत नाममात्र दरात आपल्या रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. गेली सुमारे १७ वर्षे ही रूग्ण सेवा अखंड सूरू आहे. रूग्णांना याचा लाभ होत आहे, आम्हाला त्याचा अभिमान आहे.
पंढरपूरच्या वारीसाठी मोफत वैद्यकिय सेवा :-
पंढरपूरची आषाढवारी ही महाराष्ट्राच्या वारसाची वैभवी परंपरा आहे. संत परंपरेच्या तत्वज्ञानाची वाहती गंगा आहे. तिर्थक्षेत्र श्री आळंदी, श्री देहू ते पंढरपूर अशा संतश्रेष्ठांच्या पालखी सोहळया समवेत पायी चालणा-या लक्षावधी वारकरी बंधुभगिनींची आरोग्यसेवा आपण आपण फिरत्या रूगणवाहिकेद्वारे करतो. अनुभवी व सेवाभावी डॉक्टर्स आणि नर्सेस या फिरत्या दवाखान्यावर काम करतात. संपूर्ण औषधोपचार हा विनामूल्य केला जातो. वारक-यांचे उत्तम आरोग्य रहाणे हाच या सेवेचा लाभ आहे. वारीच्या पुण्यातील आगमनाच्या वेळी आपण सर्व वारक-यांना श्रींचा प्रसाद देतो व त्यांचे आर्शिवाद घेतो.
बाल संगोपन केंद्र :-
मंडळाच्या परिसरात देवदासींची वस्ती आहे. या देवदासींच्या संगोपन करणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करून त्यांना समाजात उभे करण्याची जबाबदारी ट्रस्टने घेतली आहे. या बालसंगोपन केंद्रात पहिल्या दिवसापासून असलेली मुले आज शिकून स्वत:च्या पायावर उभी राहिली आहेत. अनेकांनी स्वत:चे संसार थाटले आहेत. या केंद्रातील मुली मोठया झाल्यानंतर त्यांना कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत भरती करण्यात आले आहे. या केंद्रातील मुलांना जेवण, राहणे, कपडे, शिक्षणाचा खर्च इतकेच काय पण शाळेत जाण्यासाठी बसचा पासही ट्रस्टतर्फे काढून दिला जातो. तसेच या मुलांच्या पालकांना भेटण्यासाठी एकदा परवानगी दिली जाते. त्यावेळी पालकांना काही भेट आणण्यास मनाई करण्यात आली आहे. जातपात, धर्म काही न बघता मुलांना केंद्रात सामील करून घेतले जाते. त्यांना श्लोक, प्रार्थना शिकवल्या जातात. भेदभावविरहित वातावरणातून त्यांच्यावर 'समतेचा' संस्कार केला जातो.
उपक्रम
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे वर्ष भरातील सामाजिक, सांस्कृतिक व इतर उपक्रम
राष्ट्रीय गणेशोत्सव पारितोषिक सोहळा :-
२००६ च्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धांचे निकाल हाती येताच आपण पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड येथील गणेशोत्सव स्पर्धेच्या बक्षिसांचे वाटप करण्यात आले. हा बक्षिस समारंभ ऑगस्ट २००७ मध्ये संपन्न झाला. त्यास पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, महापौर, नगरसेवक, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त उपस्थित होते. १९६७ पासून गणेशोत्सवामध्ये परिवर्तन घडावे, बदल घडावा, त्याला विधायक व रचनात्मक स्वरूप प्राप्त व्हावे. युवावर्ग मोठया प्रमाणात या उत्सवात यावा आणि लोकमान्यांच्या विचारांचा गणेशोत्सव घडावा यासाठी या स्पर्धा आपण आयोजित करीत आलो आहोत. प्रतिवर्षी लाखो रूपयांची पारितोषिके देऊन उत्सवाचे स्वरूप बदलण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत.
चैत्र शुध्द प्रतिपदा (गुढीपाडवा)
सन १९८४ च्या अमृतमयी गुढीपाडव्याच्या शुभदिनी मंगलमूर्ती गणरायांचे आगमन श्री मंदिरात झाले. गुढीपाडवा म्हणजेच चैत्र शुध्द प्रतिपदा.या शुभदिनी प्रभुरामचंद्र हे वनवास संपवून आयोध्येत परतले म्हणून त्यांच्या स्वागतासाठी समस्त नागरिकांनी घरावर गुढया उभारून त्यांना मानवंदना दिली. म्हणूनच हा दिवस सर्व सनातन धर्मीयांसाठी अत्यंत शुभ आहे. याच शुभदिनी श्रींच्या मंदिराच्या वर्धापना प्रित्यर्थ आपण सर्वजण सकाळी आपल्या मंदिरासमोर गुढी उभारतो तिची मिरवणूक काढतो, गुलाब पुष्प व पेढा वाटून नागरिकांना शुभेच देतो कारण हा शुभदिन आपला हिंदू नववर्ष दिन म्हणून आपण साजरा करतो.
संगीत महोत्सव :-
मंगलमूर्ती गणरायाच्या मदिरांच्या वर्धापनदिन (गुढीपाडवा) आपण संगीत महोत्सव आयोजित करून साजरा करतो. गुढीपाडवा ते रामनवमी अखेर प्रतिवर्षी रसिकांसाठी आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कलावंताना पाचारण करून साजरा केला जातो. हा संगीत महोत्सव पूर्णपणे विनामूल्य असतो. भारतामध्ये विनामूल्य संपन्न केला जाणारा आंतरराट्रीय किर्तीच्या कलावंतांचा साजरा होणारा हा एकमेव असा अव्दितीय संगीत महोत्सव आहे व संगीत महोत्सव १९८४ पासून सुरू आहे.
सांस्कृतिक उपक्रम:-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट संगीत महोत्सव हा शब्द कलाकारांसाठी सवयीचा झाला आहे. गणरायाच्या भक्तांना, मंडळाच्या परिसरातील लोकांना चांगल्या कलाकारांचे कार्यक्रम बघायला मिळावेत आणि तेही विनामुल्य या हेतुने संगीत महोत्सवाला सुरूवात झाली. गायन, वादन, नृत्य या क्षेत्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकार श्रीं समोर हजेरी लावून गेले आहेत. त्यातील अनेक कलाकार या महोत्सवात असो किंवा नसो, पण श्रीं च्या दर्शनासाठी वर्षातून एकदा तरी हमखास येतातच.
राष्ट्रीय गणेशोत्सव योजना :-
लोकमान्य टिळकांच्या विचारांचा गणेशोत्सव साजरा व्हावा, उत्सवाच्या माध्यमातून जनजागृती व्हावी, लोकशिक्षण घडावे, मनोरंजनातून प्रबोधन व्हावे, देवाचे देवपण रहावे, धर्म, संस्कृती व परंपरेची अभिवृध्दी व्हावी, देशाच्या, राज्याच्या प्रश्नांचे जनजागरण घडावे, नव्या विचाराचा नव्या उमेदीचा नवतरूण या उत्सवामधून घडावा उत्सवाला विधायक वळण लागावे यासाठी राष्ट्रीय गणेशोत्सव पारितोषिक योजना आपण सुरू केली. त्यामध्ये शेकडो मंडळे प्रतिवर्षी सहभाग घेतात या स्पर्धेमध्ये मंडळाचे वर्षभरातील कार्य (सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकिय इत्यादी क्षेत्रामधील) उत्सवातील सजावट, शिस्त इत्यादी गोष्टी आपण विचारात घेतो. सुमारे ५ लाखांची बक्षिसे आपण आपण मंडळांना देतो व ह्याचा परिणाम आता चांगला दिसू लागला आहे. व्यसनमुक्ती, व महिलांचा सहभाग व विधायक समाजाभिमुख कार्य हे मंडळांकडून घडू लागले आहे, व हीच या योजनेची फलश्रुती आहे.
चार्तुमासातील सत्संग लाभ :-
चार्तुमासामध्ये प्रवचन, किर्तन, साधुसंतांचा सत्संग करणे ही आपल्या भारताची सांस्कृतिक परंपरा आहे. या परंपरेला अनुसरून प्रतिवर्षी आपण हरीभक्त पारायण श्री बाबा महाराज सातारकर यांचे एक महीना प्रवचन व किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करतो. प्रतिवर्षी वेगवेगळया विषयांवर प्रवचन होते. ज्ञानेश्वरी, संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम, श्री. गणपती बाप्पा यासारख्या विषयावर अत्यंत विस्तृत, भक्तीपूर्ण, संसारातील व्यावहारीक, प्रापंचीक दाखले देत हसत खेळत कधी गांभीर्याने त्याचा अध्यात्मीक मतीतार्थ समजावून देत बाबा महाराज सर्वांना मंत्रमुग्ध करतात व अवघा समाज भक्तीरसात बांधीलकीच्या जाणिवेने बाबा महाराज भक्तांना भागवत धर्माच्या माळा घालतात, ह्याचा परिणाम म्हणजे अनेकांची व्यसने सुटली व लोकांना योग्य दिशा मिळाली.
कृतज्ञता पुरस्कार :-
उत्तम समाजाच्या धारणेसाठी ज्यांनी आपले आयुष्य चंदनासारखे झिजवले आहे, जीवनाला स्पर्श करणा-या साहित्य, संगीत, नाटय, क्रिडा, कला, आरोग्य, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रात काम करून लोकांचे जीवनात आनंद निर्माण केला आहे. अशा कर्मयोग्यांच्या गुणांचा सत्कार, गौरव करावा यासाठी ट्रस्टने कृतज्ञता पुरस्कार सुरू केला आहे.
शिवजयंती व्याख्यानमाला :-
सार्वजनिक गणोत्सवाच्या माध्यमातून वैचारिक प्रबोधन व्हावे. लोकशाही, न्यायालय, सरकार, घटना, कायदा, सामाजिक बांधिलकी समजावी. केद्राचे व राज्याचे प्रश्न ते सोडविण्याचे बाबतीत स्थिती आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, शेती विषयक, आरोग्य विषयक, सहकार विषयकचे प्रश्न समजावेत, महागाई, बेकारी, भ्रष्ट्राचार यावर मार्ग निघावा, भारतीय संस्कृती, इतिहास, परंपरा, आदर्श यांचे महत्व समजावे. धर्म, अध्यात्म, तत्वज्ञान, याबाबत लोकशिक्षण घडावे, समर्थ बलशाली, भारत देश घडवण्यासाठी तरूणांना देशाची, देशप्रश्नांची ओळख व्हावी, शिवरायाचे तेज सामर्थ्य व निती याचा आदर्श समाजापुढे यावा यासाठी आम्ही सन १९६८ पासून अव्यह्यातपणे ही ज्ञानमालिका चालवित आहोत. या व्याख्यानमालेसाठी महाराष्ट्रातील अनेक विचारवंतांचे विचार ऐकण्याची संधी सर्वांना मिळाली आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले, बाळासाहेब भारदे, श्रीराम शेवाळकर, बँ. विठ्ठलराव गाडगीळ, एस.एम. जोशी, बाबासाहेब पुरंदरे इत्यादी मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत. शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढतो. विविध पथके व असंख्य नागरिकांच्या सहभागाने या मिरवणूकीत चैतन्य प्राप्त होते व समर्थांचे शब्द आठवतात. शिवरायाचे आठवावे रूपं। शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप। भुमंडळी।।
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.
