

पुणे, दि.22 (प्रतिनिधी) - पुणे शहर आणि जिल्ह्यातील एकूण २१ मतदारसंघांची विभागणी मतदारांनी योग्य प्रमाणात केली असून राष्ट्रवादीला ६, काँग्रेसला ४, सेनाभाजपला प्रत्येकी ३, मनसेला १ आणि अपक्षांना ४ जागा मतदारांनी दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय दृष्ट्या मतदारांनी प्रत्येकाला त्यांच्या कुवतीप्रमाणे जागांचे दान टाकले आहे.
काँग्रेसआघाडी व सेनाभाजप युतीने सर्वच जागा आपापसात वाटून लढवल्या होत्या. त्यात राष्ट्रवादीने सर्वात जास्त म्हणजे पंधरा जागा लढवल्या होत्या तर काँग्रेसने सहा. त्यापैकी राष्ट्रवादीचे सहाजण अधिकृत उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसचे चारजण विजयी झाले आहेत. मनसेने कमी जागा लढवूनही त्यांना एक जागा रमेश वांजळेच्या रूपाने मिळाली असून त्यांनी खाते उघडले आहे.
भाजपचे गिरीश बापट यांची कसब्यातून निवडणूक लढवण्याची पाचवी वेळ होती. त्यात त्यांनी आज सलगपणे चैाथ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांच्यानंतर दोन नंबरची मते मनसेचे रवींद्र धंगेकर यांनी घेतली तर काँग्रेसचे रोहित टिळक तिस-यां क्रमांकावर फेकले गेले. शिवाजीनगर मतदारसंघातून मागच्या दोन वेळेला विनायक निम्हण शिवसेनेच्या तिकीटावर आमदार झाले होते. पण यावेळी ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेसची संख्या एकने वाढली.
कोथरू़ड या सेनेच्या बालेकिल्ल्यात चंद्रकांत मोकाटे यांना मनसेचे किशोर शिंदे यांनी चांगलीच फाइट दिली. सुरूवातीला काही फे-यात शिंदे हे आघाडीवर होते. पण नंतर मोकाटे यांनी आघाडी तोडून मताधिक्य मिळवले आणि ते कायम राखत निवडून आले. खडकवासला हा नव्याने झालेला मतदारसंघ केवळ रमेश वांजळे यांच्यामुळे मनसेला मिळाला. अर्थात वांजळे ज्या पक्षातर्फे उभे राहिले असते त्या पक्षाला तो मिळाला असता. पण या मतदारसंघात राज ठाकरे, शर्मिला ठाकरे प्रचारासाठी आल्या होत्या.
पर्वती हा भाजपचा म्हणजेच युतीचा मतदारसंघ. लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघातून भाजपला चार पाच हजारांची आघाडी मिळाली होती. यावेळी त्यांनी हीच आघाडी वाढवली. त्यामुळे माधुरी मिसाळ सहजपणे जिंकल्या. त्याच बरोबर त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचा उमेदवारही कच्चा होता. त्याचाही फायदा त्यांना मिळाला. हडपसर मतदारसंघात काँग्रेसने पाचव्यांदा बाळासाहेब शिवरकर यांना उमेदवारी दिली. इथेच सेनेचे महादेव बाबर यांचा विजय निश्तित झाला. कारण शिवरकर यांना पक्षातूनच नव्हे तर आघाडीतूनही प्रचंड विरोध होता. त्याच बरोबर माळी विरूद्ध मराठा हा वादही त्यांच्या उपयोगी पडला नाही. या सगळ्याचा फायदा बाबर यांनी घेतला. त्याच बरोबर त्यांनी गेल्या दहा वर्षात कोंढव्यात मजबूत पाया करून ठेवला होता तो मताधिक्यासाठी उपयोगी पडला.
कॅन्टोन्मेंट मतदारसंघ राखीव झाला. कॅास्मोपाँलिटन मतदार संघ असल्याने मतदारांनी मतदान करण्यात फार उत्साह दाखवला नाही. तेथे काँग्रेसचे रमेश बागवे हे सहजपणे विजयी झाले. वडगावशेरी मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे बापू पठारे विजयी झाले. त्यांना गाववाल्यांची भरभक्कम साथ मिळाल्याने त्यांना हे साध्य करता आले.
जिल्ह्यातही हाच फाँर्म्युला
जिल्ह्यातील तेरा जागांपैकी पिंपरी चिंचवडमध्ये तीन जागा होत्या. त्यातील चिंचवड व भोसरीत बंडखोर निवडून आले तर पिंपरीत राष्ट्रवादीचे आण्णा बनसोडे िनवडून आले आहेत. उर्वरीत जिल्ह्यात भाजपला मावळ तर सेनेला पुरंदरची जागा मिळाली आहे. भोरची जागा काँग्रेसचे संग्राम थोपटे यांनी तर इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील यांनी राखली आहे. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे बंडखोर उभे होते. त्यांना त्यांच्या नेत्यांनी सगळी रसद पुरवली होती. बाकी आंबेगाव, जुन्नर, खेड आणि अिजत पवारांची बारामती या जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत, दैाड, शिरूरमध्ये बंडखोर जिंकले आहेत.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या