Skip to content
जाहिरात

राज ठाकरे यांच्या बाजूने पुणे करांचा वाढता कल, युतीला धोका

October 22, 2009

पुणे, दि. २२ (प्रतिनिधी) - या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिमार्ण सेनेचे राज ठाकरे यांच्या बाजूने पुणेकरांचा कल वाढला असल्याचे आज दिसून आले. लोकसभेपेक्षा जास्त मत यावेळी मनसेची वाढलेली मत आणि कसबा, कोथरूड या युतीच्या बालेकिल्ल्यातच जोरदार मुसंडी मरल्याचे मतपेटीतून उघड झाले. ही सेना-भाजपसाठी धोक्याची घंटा आहे.

मनसेने पुणे शहरातील आठही मतदारसंघापैकी सात ठिकाणी उमेदवार दिले होते. त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी सभाही घेतल्या. त्याचा परिणाम असा झाला की मतदारांनी मोठ्या प्रमाणावर पर्याय म्हणून मनसेचा स्वीकार केला असल्याचे मतांचा आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. यात रमेश वांजळे हे निवडून आले असले तरी ते ज्या पक्षातर्फे उभे राहिले असते त्या पक्षाला ती जागा मिळणारच होती. त्यांचे पक्षावर काहीच अवलंबून नव्हते. त्यामुळे ही जागा जरी मनसेच्या खात्यात जमा असली तरी ती वांजळे यांची आहे.
मनसेने कसबा (रवींद्र धंगेकर), कोथरूड ( किशोर शिंदे), शिवाजीनगर (रणजीत शिरोळे), पर्वती (गदादे पाटील), हडपसर (वसंत मोरे) आणि वडगाव शेरी (राजू एंडल) यांना तिकीटे दिली होती. हे सर्वजण पक्षाचे पदाधिकारी किंवा नगरसेवक आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी हडपसर, रमणबाग, शिवाजीनगर, कोथरूड आणि वडगावशेरी येथे जाहीर सभा घेतल्या. पर्वतीत तर अन शेड्युल्ड सभा सकाळी नऊ वाजता घेतली. तसेच शर्मिला ठाकरे यांनी रोड शो केले. खडकवासला मतदारसंघातही जाहीर सभा व रोड शो झाले.
या सगळ्याच परिणाम मतपेटीतून दिसून आला. लोकसभा िनवडणुकीत शिरोळे यांना ७२ हजार मत पडली होती. पण या विधानसभेला त्यापेक्षा कितीतरी जास्त मतदान मनसेला झाले आहे. कोथरूडमधून तर शिंदे यांनी सुरूवातीच्या काही राऊंडमध्ये आघाडी घेतली त्यांनी सेनेच्या मोकाटे यांना घाम फोडला होता, पण अखेर मोकाटे जिंकले अन शिंदे दुस-या क्रमांकावर गेले.
अशीच स्टोरी कसब्यात झाली. तेथे लढत झाली ती बापट आणि धंगेकर यांच्यात. या मतदारसंघात धंगेकर हे काँग्रेसची मत खेचण्यात यशस्वी झाले पण सेनेभाजपची मत आपल्याकडे वळवण्यात त्यांना यश आले नाही.त्यामुळे विजयांने त्यांना हुलकावणी दिली. पर्वतीत गदादे यांनी जरी तिस-या क्रमांकाची मत असली तरी राष्ट्रवादीचे उमेदवार तावरे आणि त्यांच्यात काही दोन आकडी मतांचा फरक आहे. मोरे, एंडल यांनी अपेक्षे इतकी मत घेतली. मनसेने जागा जरी जास्त लढवल्या असल्या तरी त्यांनी त्यापैकी टार्गेट केलेल्या जागा होत्या फक्त पस्तीस आणि त्यात पुण्यातील एकही जागा नव्हती. वांजळे यांची जागा टार्गेट केली नसली तरी ती मिळेल असा त्यांच्या नेत्यांचा अंदाज होता.
त्यामुळे पुणे शहर लोकसभा मतदारसंघापुरते बघायचे झाले तर कसबा. पर्वती, कोथरूड येथे त्यांना चांगली मत मिळाली. शिवाजीनगरमध्ये मतदान कमी झाल्यने अपेक्षे इतकी मत मिळाली नाहीत. वडगावशेरीमध्ये त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त मत मिळाली. कॅन्टोन्मेंट त्यांनी लढवलाच नव्हता. त्यामुळे एकूण गोळा बेरीज करायची झाली तर लोकसभेपेक्षा मनसेला जास्त मत मिळाली असून राज ठाकरे यांच्याकडे पुण्यातील तरूणांचाच नव्हे तर सर्वच मतदारांचा कल वाढत असल्याचे मतपेटीतून उघड झाले आहे.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या