

पुणे,दि. 27 (प्रतिनिधी) - अखेर पुणे महापालिकेतील पुणे पॅटर्नचे आज अधिकृतपणे विसर्जन करण्यात आले. आज झालेल्या शहर सुधारणा व विधी समितीची अध्यक्षपदे दोन्ही काँग्रेसनी आपापसात वाटून घेतल्याने सेनाभाजपकडे एकही पद राहिलेले नाही.
गेली अडीच वर्षे पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, सेना आणि भाजप असा पुणे पॅटर्न सत्तेत होता. पण विधानसभा निवडणुकीत अजित पवार आणि सुरेश कलमाडी यांच्या प्रतिभोजनाने पॅ़टर्नचे विसर्जन झाल्याचे जाहीर करण्यात आले. पण तरीही पुढे नेमके काय होणार याबद्दल उत्सुकता होती. त्यामुळे निवडणूक निकालानंतर लगेचच शहर सुधारणा व विधी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक होती. त्यात काय होणार याकडे सर्वाचे लक्ष होते.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज शहर सुधारणा समितीचे अध्य़क्षपदी काँग्रेसचे किरण बारटक्के तर विधी समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा कळमकर या निवडून आल्या आहेत. त्यामुळे पुणे पॅटर्नचे आज अधिकृतपणे विसर्जन झाल्यावर शिक्का मोर्तब झाले. आता नविन दादा भाई मिलके खाए असा पॅटर्न अस्तित्वात आला असून आजमितीला भाजपसेनेकडे एकही पद नाही.
पुणे महापालिकेत अडीच वर्षांपूर्वी विकासाच्या नावाखाली हे तिन्ह पक्ष एकत्र आल होते. त्यामुळे महापाैर व स्थायी समितीचे अध्यक्षपद, सभागृहनेता ही पदे राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. उपमहापाैरपद आणि एक वर्ष स्थायी समितीचे अध्यक्षपद सेनेकडे तर सुरूवातीला विरोधीपक्षनेतेपद व शिक्षण मंडळ अध्यक्षपद भाजपकडे होते.
भाजप हा सत्ताधारी पक्षाबरोबर असल्याने त्यांच्याकडे विरोधीपक्ष नेतेपद राहूच शकत नाही या मुद्यावर काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर काही महिन्यापूर्वीच विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसला देण्याचे आदेश देण्यात आले.त्यामुळे भाजपचे विकास मठकरी यांना राजीनामा द्यावा लागला होता. काँग्रेसचे आबा बागूल यांच्याकडे विरोधीपक्ष नेतेपद दे्ण्यात आले.सत्ताधा-यांना साथ देऊनही भाजपच्या पदरात फक्त शिक्षण मंडळाचे अध्यक्षपद राहिले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी पॅटर्नमधून बाहेर पडत असल्याची घोषणा सेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी केली. त्याच बरोबर भाजपच्या नेत्यांनीही बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सेनेचे चंद्रकांत मोकाटे यांनी उपमहापाैरपदाचा तर महेश लडकत यांनी शिक्षण मंडळ अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच विषय समित्यांच्या अध्यक्षांनीही राजीनामे दिले आहेत. समित्यांची अध्य़क्षपदे रिक्त झाल्याने त्यासाठी आज निवडणुका झाल्या. ही पदे काँग्रेस व राष्ट्रवादीने आपापसात वाटून घेतली.
भाजपसेनेचे महापालिकेत पंचेचाळीस नगरसेवक असूनही आज त्यांच्याकडे एकही पद नाही. विरोधीपक्षनेते पदही काँग्रेसकडे आहे. उपमहापाैरपदावर अपक्ष नगरसेवक निवडून आला तर विरोधीपक्ष नेतेपद काँग्रेसकडेच राहू शकते.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या