Skip to content
जाहिरात

गृहराज्यमंत्री पदाने काँग्रेसने पुण्यात केली राष्ट्रवादीवर मात

November 9, 2009

पुणे, (प्रतिनिधी)- या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचे पुण्यातून प्रत्येकी दोनच आमदार निवडून आले. त्यात पुणे शहरात काँग्रेसने रमेश बागवे या पक्षसंघटनेतील कार्यकर्त्याला गृहराज्यमंत्री करून राष्ट्रवादीला मोठा शह देत त्यांच्यावर राजकीय मात केली आहे. भाई वैद्यानंतर गृहराज्यमंत्री होणारे ते दुसरे आमदार ठरले आहेत.

पुणे शहरात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील शहकाटशहाचे राजकारण गेली अडीच वर्षे गाजत आहे. त्यामुळे पुणेकरांची चांगली करमणूक झाली. लोकसभा निवडणुकीपर्यत हे शहकाटशहाचे राजकारण सुरू होते. पण विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अजित पवार आणि खासदार सुरेश कलमाडी यांच्यात डिनर डिप्लोमसी झाली आणि दोघे एकत्र आले. इतके होऊनही त्यांच्यात पडद्यामागून पाडापाडीच्या हलचाली सुरूच होत्या, त्यामुळे शेवटी दोन्ही काँग्रेसचे फक्त दोनदोनच आमदार निवडून आले.
मंत्रीमंडळात कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. अखेर दुस-यांदा आमदार झालेल्या बागवे यांची वर्णी लागली आणि गृराज्यमंत्रीपद त्यांना मिळाले. त्यामुळे पहिल्या फेरीत तरी काँग्रेसने बाजी मारली आहे. त्यांनी बागवे सारखा संघटनेतील जुन्या कार्यकर्त्याला संधी दिली, त्याचवेळी त्यांच्यारूपाने मागासवर्गियांना व मातंग समाजा काँग्रेसकडे ओढला. काँग्रेसने प्रथमच मातंग समाजाला मंत्रीपद दिले आहे, अशी अनेक समीकरणे काँग्रेस नेतृत्वाने बागवे यांच्यामार्फत सोडवली आहेत.
पुण्यातून काँग्रेसचे दोनजण निवडून आले असून त्यातील दुसरे विनायक निम्हण हे नारायण राणे यांचे समर्थक आहेत. त्यांची आमदार होण्याची तिसरी वेळ असूनही केवळ पक्ष संघटनेशी एकनिष्ठ म्हणून बागवे यांना कमी अनुभव असला तरी त्यांच्यावर मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे. पुण्यात राणे यांच्यापेक्षा कलमाडींना जवळ करण्याचे धोरण काँग्रेसच्या नेतृत्वाने स्वीकारले.
शेवटी काँग्रेसची संघटना पुण्यात वाढवण्यासाठी व मजबूत करण्यासाठी या मंत्री पदाचा उपयोग करावा अशी नेत्यांची अपेक्षा असणार. पुणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस वाढत होती. तसेच महापालिकेत अडीच वर्षे सत्ता काँग्रेसला बाजूला ठेवून राष्ट्रवादीने राबवली. त्यामुळे पुन्हा एकदा शहरात काँग्रेसला बळकटी देण्यासाठी थेट गृहराज्यमंत्री पदच काँग्रेसने पुण्यात दिले आहे.
यापूर्वी स्व. जयंतराव टिळक व युतीच्या काळात शशिकांत सुतार हे कॅबिनेट मंत्री होते. पुलोदमध्ये भाई वैद्य गृहराज्यमंत्री होते, युती शासनात दिलीप कांबळे त्यानंतर चंद्रकांत छाजेड, बाळासाहेब शिवरकर हे राज्यमंत्री होते. मागच्या पाच वर्षात पुण्याला एकही मंत्रीपद देण्यात आलेले नव्हते. ही कसर यावेळी काँग्रेसने दणदणीत खाते देऊन भरून काढली आहे.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या