Skip to content
जाहिरात

पुण्यात गृहराज्यमंत्र्यांचा सत्कार झाला अन पोलिसावर वार

November 15, 2009

पुणे, (प्रतिनीधी) - राज्यमंत्रीमंडळात प्रथमच गृह राज्यमंत्री म्हणून समावेश झालेल्या रमेश बागवे यांचा जंगी सत्कार पुण्यात काँग्रेस भवानत झाला. त्यानंतर संध्याकाळी असाच सत्कार झाला. मात्र या दोन कार्यक्रमा दरम्यान ताडिवाला रोड पोलिस चौकीच्या बाहेर पोलिस शिपाई बर्गे कोयत्याचे वार झेलत होते.

मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बागवे यांचे प्रथमच पुण्यात आगमन झाले. त्यामुळे त्यांचे जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केला, काँग्रेस भवनात त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. हे सगळे स्वाभाविकच होते. कारण जवळपास 32 वर्षानंतर गृहराज्यमंत्रीपद पुण्याला बागवे यांच्या रूपाने मिळाले आहे. पण इकडे हा सत्कार समारंभ संपन्न होत असताना ताडिवाला रोड चौकीच्या बाहेर एकाने पोलिस शिपाई बर्गेवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली.
दुपारी चारच्या सुमारास काही महिला ताडिवाला रोड चौकीत आल्या. एकजण कोयत्याने घरा समोरचे पाण्याचे भरलेले बॅरल फोडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शिपाई सुहास पांडुरंग बर्गे व त्यांचे साथीदार देशमुख हे ताडिवाला रोड येथे जाण्यासाठी मोटार सायकलवरून निघाले.
मोटार सायकल बर्गे चालवत होते. ते मोटार सायकल चौकीतून बाहेर काढत असताना समोरून एकजण कोयता घेऊन आला. त्याने कोयत्याने बर्गे यांच्यावर वार केला. तो त्यांनी चुकवला पण त्यांच्या डाव्या हाताचा अंगठा तुटला. पहिला वार वाया गेल्याने त्या माणसाने दुसरा वार गाडीवरून पडणा-या बर्गे यांच्यावर केला तो निसटता त्यांच्या पाठीत बसला.
काही मिनिटाचे हे नाट्य होते. दोन वार करून ती व्यक्ती तेथून गल्ली बोळातून पळून गेली. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. तो विलास अनिल गायकवाड असून रेल्वेमध्ये हमाल आहे. त्यानेच वार केल्याचे कबूल केल्यान त्याला अटक करण्यात आली आहे.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या