Skip to content
जाहिरात

पुण्यात काँग्रेसच्या कार्यक्रमाची वंदे मातरम ने सुरूवात

November 19, 2009

पुणे, (प्रतिनिधी) - उलेमांच्या वंदे मातरम म्हणू नका या मुस्लीमांसाठी काढलेल्या फतव्यावरून गेले काही दिवस जोरदार वादळ पुन्हा उठले आहे.त्यात काँग्रेसचे नेते मूग गिळून गप्प बसले असताना पुण्यात आज इंदिरा गांधी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात काँग्रेस सेवादलच्या कार्यकर्त्यांनी वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाची सुरूवात केली.

देशातीन मुस्लीम धर्मगुरू उलेमांची राष्ट्रीय परिषद नुकतीच झाली. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या उपस्थितीत उलेमांनी वंदे मातरम इस्लामच्या विरूध्द असल्याने मुसलमानांनी ते म्हणू नये असा फतवाच त्या कार्यक्रमात काढला. त्यावरून पुन्हा एकदा वादळ उठले. अनेक मुस्लीम नेत्यांनी त्या फतव्याचा निषेध केला आहे. त्याच प्रमाणे फारूक अब्दुल्ला यांच्या सारख्या ज्येष्ठ मंत्र्यांनीही त्याचा निषेध केला आहे.
असा निषेधाचा सूर सर्वत्र सुरू असताना काँग्रेसचे नेते मात्र त्याबद्दल काहीच बोलायला तयार नाहीत. त्यांनी निषेध केला नाहीच उलट प्रतिक्रीया न देता त्या फतव्याला मूक संमती असल्याचे दाखवून दिले आहे. सेवादलाच्या कार्यक्रमात वंदे मातरम म्हणण्याची परंपरा असल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी येण्याचे कबूल करूनही सेवादलाच्या कार्यक्रमाला जाण्याचे टाळले. वर निमंत्रणच आपल्याला मिळाले नाही अशी सारवासारव केली.
या सर्व घटनांबद्दल पुण्याच्या काँग्रेस भवनातील ज्येष्ठ कार्यकर्ते भुवडदादा यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. ईन्यूजशी बोलताना ते म्हणाले की, जन गण नम हे भारताचे राष्ट्रगीत आहे. ज्या घटनेत हे राष्ट्रगीत असल्याचे मान्य करण्यात आले आहे त्याच्याच खाली दुस-या दर्जाचे राष्ट्रगीत म्हणून वंदे मातरमला मान्यता दे्ण्यात आली आहे. काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनाची सुरूवात ध्वजगीत आणि त्या नंतर वंदे मातरमने करण्याची परंपरा आहे. वंदे मातरम हे काँग्रेसचे गीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अशा या वंदे मातरम बद्दल उलेमां फतवा काढता आणि काँग्रेसचे एकही नेते त्याचा निषेध करत नाहीत याबद्दल खंत व्यक्त करून भुवड म्हणाले की, स्व. नरसिंहराव हे पंतप्रधान असताना त्यांच्या कारकिर्दीत काँग्रेसची चार अधिवेशने झाली. त्याप्रत्येक वेळी सुरूवात वंदे मातरमनेच झाली होती. स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात ध्वजगीत, वंदे मातरम व शेवटी राष्ट्रगीत म्हणण्याची जबाबदारी सेवादलावरच सोपवण्यात आली आहे.
कदाचित सोनिया गांधी यांना हे महिती नसेल तर त्यांनी ही योग्य महिती देण्याचे काम त्यांच्या जवळच्या नेत्यांचे होते. पण दुर्दैवाने त्यांनी ते केले नाही. सेवादलाच्या कार्यक्रमात वंदे मातरम म्हटले जाते म्हणून सोनिया गांधी आल्या नाहीत. वर त्यांनी निमंत्रणच मिळाले नसल्याचे सांगून वेळ मारून नेली. त्यांच्या जवळच्या नेत्यांनी जर योग्य महिती दिली असती तर त्या सेवादलाच्या कार्यक्रमाला नक्की आल्या असत्या. काँग्रेस नाही तर निदान सेवादलाच्या कार्यक्रमाची सुरूवात वंदे मातरमने व्हावी असा प्रयत्न होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 92 व्या जयंती निमित्त काँग्रेस भवनात बारा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरूवात वंदे मातरमनेच कऱण्यात आल्याचे भुवडदादांनी अभिमानाने सांगितले.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या