

पुणे, दि. 4 (प्रतिनिधी) - स्वाइन फ्लूची पसरवलेली दहशत ठोकरत पुणयातील गणेश विसर्जन सोहळ्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते व मंडळे सहभागी झाली होती. ढोल ताशांचा दणदणाट करत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोषात गणरायाला निरोप दिला. त्यासाठी पुणेकरही रस्त्यावर आले होते. तब्बल 26 तास चाललेल्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीत 517 मंडळांनी सहभाग घेत यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता केली.
यंदाचा गणेशोत्सव आला तो स्वाइन फ्लू नावाचे परदेशी संकट घेऊनच. त्यात स्वकीयांनी निवडणूक आचार संहितेने भर टाकली. त्यामुळे यंदा उत्सवाच्या दिवसात गर्दी झाली नाही. त्यामुळे वैभवशाली विसर्जन सोहळ्याची परंपरा असलेल्या मिरवणूकबद्द्ल कुतुहल होते.सर्व शंकांची उत्तरे 26 तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीने दिली. मुख्य मिरवणूक असलेल्या लक्ष्मी रोड सह टिळक रोड, कुमठेकर व केळकर रोड अशा चार मार्गावरून मिरवणुकीत एकूण 517 मंडळे सहभागी झाली होती. विसर्जन मिरवणुकीच्या चारही मार्गांवरून बिगर रोषणाईचे 310 तर रोषणाईचे 207 गणपती सामील झाले होते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी (दि.3) सकाळी साडे दहा वाजता मिरवणुक सुरू झाली. शेवटच्या गणपतीचे विसर्जन दुस-या दिवशी म्हणजे दि.4 ला साडेबारा वाजता झाले.
गेल्या वर्षी अशीच विसर्जन मिरवणूक तब्बल 29 तास चालली होती. त्यात याच चारही मार्गांवरून एकूण बिगर रोषणाईचे 226 तर रोषणाईचे 152 गणपती सामील झाले होते. यंदा स्वाइन फ्लूची दहशत असल्याने गर्दी टाळण्यासाठी हत्ती गणपती, निंबाळक तालीम अशा सुमारे शंभर मंडळांचा मिरवणुका रद्द करण्याचा स्टंट ठरला. कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत मंडळांची संख्या जास्त असूनही मिरवणूक तीन तास लवकर संपली. त्यात ढोल लेझीमचे संघ,
बँण्ड होते तर काही मंडळांनी उत्साहाच्या भरात गुलालही उधळला. तरी प्रमुख मंडळांनी गुलाल न उधळल्याने एकूण मिरवणुकीत गुलालाचे प्रमाण कमी होते.
प्रथेप्रमाणे महापाैर राजलक्ष्मी भोसले यांनी मंडईतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला तसेच मानाच्या गणपतींना हार अर्पण करून त्यांची आरती करून विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ केला.यंदा सरकारने पसरलेल्या स्वाइन फ्लूची दहशतीने रस्त्यावर गर्दी तुरळक होती. पथकांची संख्याही मर्यादित होती. या मिरवणुकीचाही आनंद घेण्यासाठी काही उत्साही पुणेकर गणरायाला निरोप देण्यासाठी रस्त्यावर आले होते. कसबा गणपती व तांबडी जोगेश्वरी हे दोन मानाचे गणपती लक्ष्मी रोडवरून मिरवणुकीने अनुक्रमे दुपारी दोन व अडीच वाजता अलका टाॅकीज चैाकात दाखल झाले. त्यानंतर गुरूजी तालमीचा गणपती मात्र तब्बल दीड तासाने म्हणजे चार वाजता आला. या मंडळापुढे असलेल्या शिवगर्जना या पथकाने ढोल ताशांनी लक्ष्मी रोड दणाणून सोडत घरात टीव्हीवर मिरवणूक बघणा-यांना बाहेर येण्याचे आवाहन केले.
मानाचा पाचवा गणपती केसरी वाडा हा अलका चाैकातून पुढे गेल्यावर निलगिरीचे फवारेच गर्दीवर मारत स्वाइन फ्लूची बाधा होऊ नये याची दक्षता घेत त्वष्टा कासार समाजाचा गणपती आला. सध्याकाळी पाचच्या सुमारास पावसाचे आगमन झाले. त्यामुळे थोडी गर्दी पांगली. तासभर पावसाने सर्व रस्ते धुतले. त्यानंतर सातच्या सुमारास शनिवार पेठेतील
मेहुणपुरा मंडळाचा गणपती आला. त्यांचेच कार्यकर्ते ढोल ताशा वाजवत होते. त्यामुळे पुन्हा लोक चाैकात जमू लागले.
रथ आडवला
रात्री लक्ष्मी रोडवर अमृत महोत्सवी वर्ष असलेल्या अकरा मारूती मंडळ, जिलब्या मारूती, बाबूगेनू असे आकर्षक रोषणई असलेले गणपती येऊ लागले.त्यामुळे त्यानंतर मात्र मिरवणूक बघण्यासाठी येणा-यांची संख्या वाढत गेली. मानाचे भाऊ रंगारी, अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई असे गणपती मुख्य मिरवणुकीत सामील झाले. यंदा पोलिसांनी यांना रस्त्याकरून दिल्याने हे गणपती मध्यरात्रीपूर्वीच आले. त्यात दगडूशेठ मंडळाने गर्दीत स्वाइन फ्लूचा प्रसार होऊ नये म्हणून सर्व मिरवणुकीत धूप जाळला. त्यांनी जाहीर केल्या प्रमाणे रंगीत रोषणाई बंद केली पण गुरूजी तालीम चाैकात त्यांची मिरवणूक आडवली आणि रोषणाई सुरू केल्या शिवाय पुढे जाऊ देणार नाही अशी भूमीका घेतली. त्यामुळे सूर्य रथाची रोषणाई सुरू करणे मंडळाला भाग पडले.
गणेशोत्सवात परगावच्या लोकांनी येऊ नये म्हणून स्वाइन फ्लूचा प्रसार सरकारी यंत्रणा करत होतीच. त्यामुळे उत्सावातील अकरा दिवस शहरात गर्दीच झाली नाही. विसर्जन मिरवणूकसाठी लोक येवोत अथवा न येवोत आपण जल्लोषात गणरायाला निरोप द्यायचा असा निश्चय कार्यकर्त्यांनी केला होता. त्यामुळे अनेक मंडळांनी काही तास मंडळाच्या चाैकातच नाचणे पसंद केले. त्यामुळे मिरवणुकीत फारसे गणपती दिसलेच नाहीत. पण जसजशी रात्र चढत गेली
तसतशी मंडळे सामील होऊ लागली. केळकर रोडची मिरवणूक तर आज पहाटेच सुरू झाल्यासारखी दिसत होती. मंडई दगडूशेठचा गणपती गेल्यावर रस्ते मोकळे पडले असले तरी कार्यकर्ते त्यांच्याच आनंदात बेहोष होऊन नाचत होते. अनेक वेळा पोलिसांना या उत्साहाला आवर घालण्यासाठी पुढे यावे लागले.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या