Skip to content
जाहिरात

पवार पॉवरने पुणे संमेलनासाठी केली सव्वा कोटींची तजवीज

November 23, 2009

पुणे, (प्रतिनिधी) - पुण्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य समंलनासाठी जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी रस घेतला आहे. त्यांनी यासाठी एक कोटीची देणगी देण्याचे जाहीर केले आहेच. पण त्या शिवाय पवारांनी त्यांची पॉवर वापरून सव्वा कोटी रूपये जमा होतील याची तजवीज साहित्य परिषदेच्या हॉलमध्ये बसूनच केली.

साहित्य संमेलनाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन अजित पवारांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यानी एक कोटी रूपये देण्याची घोषणा केली. त्याशिवाय महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येणा-या पंचवीस लाखात यंदाचे राज्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून जास्त मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
पुणे महापालिकेचे पदाधिकारी महपौर राजलक्ष्मी भोसले. स्थायी समिती अध्यक्ष निलेश निकम आणि विरोधी पक्षनेते आबा बागूल त्या ठिकाणी होते. कार्यक्रम संपल्यावर त्यांना महापालिकेने या संमेलनाचे सहप्रायोजकत्व घेऊन 51 लाख रूपये द्यावेत तसा ठराव स्थायी समितीत मंगळवारीच करा असे आदेश वजा सूचना त्यानी दिल्या.
कार्यक्रम संपताना एकजण एक लाखाचा चेक संमेलनासाठी देण्यासाठी घेऊन आला होता. तो पवारांच्या हस्ते देण्यासाठी त्याने तो त्यांच्याकडे दिला. त्यावर पवार यांनी ते पाकीच तेथेच सर्वांसमक्ष उघडले आणि तो चेक वाचून फक्त एक लाखच...तुमची माझ्याकडे कामे किती आहेत त्यामुळे दहा लाख रूपये आणून द्या आणि डॉक्टर तुम्ही मला हे पैसे मिळाले की सांगा असे ही सागायला पवार विसरले नाहीत.
या संमेलनाच्या संयोजन समितीचे कोषाध्यक्ष जयंत शहा आणि सहकोषाध्यक्ष फत्तेचंद रांका आहेत. रांका या कार्यक्रमाला होते पण कार्यक्रम संपताच निघून गेले. त्यांचे नाव घेत पवार यांनी रांका कुठे गेले लावा फोन त्यांना असे म्हणत फोन लावायला सांगितला. का हो रांका न भेटताच गेला....बर या संमेलनाच्या निमित्ताने 82 कमानी उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक कमानीचे एक लाख प्रमाणे सराफांकडून तेवढे पैसे गोळा करून द्यायची जबाबदारी तुमची असे रांका यांना पवारांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षनेते आबा बागूल यांनी एक लाख रूपये दिले तर बागूल या नावाला एवढीशी रक्कम शोभत नाही अशी टिप्पणी त्यांनी केली. अशा प्रकारे साहित्य परिषदेच्या कार्यालयात बसून पवारांनी पॉवर वापरत सुमारे सव्वा कोटी रूपयांची तजवीज साहित्य संमेलनासाठी करून दिली वर सरकार किंवा महापालिका प्रशासनाकडे काही काम असेल तर मला सांगा असेही सांगायला ते विसरले नाहीत.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या

येथे दिल्या गेलेली माहिती गोपनीय ठेवल्या जाईल. तुमच्या परवानगी शिवाय ती जाहिर केल्या जाणार नाही.