

पुणे, (प्रतिनिधी) - मराठी आठवडा साजरा करण्याच्या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागानेही मराठी आठवडा साजरा करण्यात सहभागी होण्याचे मान्य केले आहे. त्याचबरोबर सर्व संलग्न महाविद्यालयांमधे मराठी आठवडा साजरा करण्याचे त्यांनी ठरवले आहे.
मराठी भाषेच्या प्रचारासाठी मराठी आठवडा साजरा केला जावा अशी संकल्पना मराठी समर्थ या संस्थेने मांडली. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात 21 फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो तर 27 फेब्रुवारी हा जागतिक मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे हा संपूर्ण आठव़डा मराठी आठवडा म्हणून साजरा केला जावा अशी मूळ संकल्पना आहे. ही संकल्पना अनेकांनी उचलून धरण्यास सुरूवात केली आहे.
या बाबत अधिकाधिक प्रचार करण्यासाठी एक मध्यवर्ती समिती स्थापन करण्यात आली असून त्या समितीच्या बैठकाही सुरू झाल्या आहेत. मराठी आठवड्याची सुरूवात शोभा यात्रेने करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. त्यात अनेक मान्यवरांसह कलाकारही सहभागी होणार आहेत. शोभायात्रा डेक्कन जिमखान्यावरील संभाजी महाराज पुतळा येथून सुरू होईल व समारोपर कोथरूडच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे होणार आहे.
या मराठी आठवड्याच्या उपक्रमात सहभाग घेण्याचे पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाने मान्य केले आहे. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयामध्ये या निमित्ताने कार्यक्रम करण्याचेही त्यांनी मान्य केले आहे. या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गाण्यांचा तसेच मराठी भाषेची महती सांगणा-या गाण्यांचा कार्यक्रम कऱण्यात येणार आहे.
या शिवाय आपल्या व्यावसायात मराठीचा वापर करणा-या तसेच मराठी व्यावसायिकांच्या सत्काराचेही नियोजन करण्यात येत आहे. यावेळी पुण्यनगरीचे महापौरपद जरी शीख समाजाला मिळाले असले तरी मोहनसिंग राजपाल हे उत्कृष्ट मराठी बोलतात व स्वताःला मराठीच मानतात त्यामुळे कोणा थोरांना या सत्कारासाठी आणण्याऐवजी महापौर राजपाल यांच्याच हस्ते हे सत्कार करावेत अशीही एक सूचना पुढे आली आहे.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या